अद्ययावत माहिती
समाजातील घडामोडी, सूचना आणि आगामी कार्यक्रमांचे अद्ययावत वेळापत्रक.
ठळक बातमी
कोकणस्थ कुंभार समाजातर्फे प्रथमच आयोजित स्पर्धेला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
🥇 प्रथम क्रमांक — श्री. राजेंद्र काशीराम साळवी (कोळकेवाडी)
🥈 द्वितीय क्रमांक — श्री. विशाल विश्वनाथ कलमकर (तिवरे)
🥉 तृतीय क्रमांक — श्री. विजय हरिचंद्र निवळकर (कात्रोळी)
पिंपरी चिंचवड : कोकणस्थ कुंभार समाजातर्फे यंदा प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या "गणपती मखर सजावट स्पर्धा २०२६" मध्ये समाजातील सभासदांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सर्व सभासदांनी अतिशय सुंदर, आकर्षक आणि कल्पक पद्धतीने आपापल्या घरातील गणपती मखराची सजावट साकारली होती.
परीक्षकांच्या निर्णयानुसार यंदाच्या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले — प्रथम क्रमांक श्री. राजेंद्र काशीराम साळवी (कोळकेवाडी) यांना, द्वितीय क्रमांक श्री. विशाल विश्वनाथ कलमकर (तिवरे) यांना, तर तृतीय क्रमांक श्री. विजय हरिचंद्र निवळकर (कात्रोळी) यांना जाहीर झाला.
समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्यांना मानचिन्ह व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व सभासदांचे तसेच विजेत्यांचे समाजातर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
सभासदांना एकत्र आणणे, कला व सर्जनशीलता जपणे आणि समाजातील एकोपा वाढवणे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यापुढेही समाजाच्या प्रत्येक उपक्रमात सभासदांनी असाच उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा समाजातर्फे व्यक्त करण्यात आली.
ठळक बातमी
चिपळूण येथे संत गोरा कुंभार विकास मंडळ व पतसंस्थेच्या वार्षिक सभेत मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार
चिपळूण : येथील संत गोरा कुंभार विकास मंडळ आणि संत गोरा कुंभार नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. सत्यवान सिताराम साळवी यांना प्रतिष्ठेच्या 'समाजरत्न पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले.
रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी संत शिरोमणी गोरोबाकाका सभागृह, चिपळूण येथे हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी शाल, श्रीफळ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करून श्री. सत्यवान साळवी यांचा गौरव करण्यात आला.
समाजासाठी निःस्वार्थ भावनेने केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यक्रमाला कुंभार समाज सामाजिक संघटना महाराष्ट्र प्रदेशचे संस्थापक श्री. सतीश दादा दरेकर, अध्यक्ष श्री. रमाकांत क्षीरसागर यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, समाजबांधव आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. सत्यवान साळवी यांना मिळालेल्या या सन्मानामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मिळालेला हा पुरस्कार समाजसेवेसाठी कार्यरत असलेल्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
चिपळूण येथे श्री. सत्यवान सिताराम साळवी यांना मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करताना पदाधिकारी व मान्यवर.
ठळक बातमी
संतश्रेष्ठ श्री गोरोबाकाका समाजरत्न पुरस्काराने शंकर धारू साळवी यांचा विशेष सन्मान
पिंपरी चिंचवड : कोकणस्थ कुंभार समाज, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने आयोजित कौटुंबिक स्नेहमेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी श्रीमती आशाताई केशव साळवी होत्या.
कार्यक्रमात समाजातील महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे संस्थेच्या सभासदांनी सादर केलेली 'कोकणची लोककला - बहुरंगी नमन' ही पारंपरिक लोककला. या बहुरंगी नमनाच्या सादरीकरणातून कोकणची समृद्ध लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा उपस्थितांसमोर प्रभावीपणे उलगडला.
स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने समाजातील सर्व कुटुंबीय एकत्र आले. या कार्यक्रमातून सामाजिक एकोपा, सांस्कृतिक जतन आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा सुंदर संदेश देण्यात आला. कार्यक्रमास समाजातील पदाधिकारी, सभासद, महिला, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड येथे कोकणस्थ कुंभार समाजाचा कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला.
ठळक बातमी
कौटुंबिक स्नेहमेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान
पिंपरी चिंचवड : समाजाच्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये वर्षानुवर्षे सक्रिय योगदान देणारे ज्येष्ठ समाजबांधव श्री. शंकर धारू साळवी यांना 'संतश्रेष्ठ श्री गोरोबाकाका समाजरत्न पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
व्यासपीठावर समाजाचे पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत मानपत्र, स्मृतिचिन्ह व शाल-श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित समाज बांधवांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री. साळवी यांनी आपल्या मनोगतात समाज बांधवांचे व कार्यकारिणीचे आभार मानले आणि पुढील पिढीने समाजकार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे कळकळीचे आवाहन केले.
समाजरत्न पुरस्कार सोहळ्यातील एक क्षणचित्र — श्री. शंकर धारू साळवी यांचा पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
ठळक बातमी
समाजाची सर्व माहिती आता एका क्लिकवर — kokanasthkumbharsamaj.com
पिंपरी चिंचवड : कोकणस्थ कुंभार समाज, पिंपरी चिंचवड, पुणे यांची अधिकृत वेबसाईट kokanasthkumbharsamaj.com नुकतीच कार्यान्वित करण्यात आली आहे.
समाजाची माहिती, बातम्या, कार्यक्रम, छायाचित्रे तसेच व्यवसाय जाहिराती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे.
वेबसाईटवर संस्थेचा इतिहास, कार्यकारिणी, मंदिर माहिती, सभासद नोंदणी, क्रिकेट स्पर्धा तसेच समाज बांधवांच्या व्यवसायांची जाहिरात यांसारख्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
समाज बांधवांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी वेबसाईटला भेट देऊन आपल्या प्रतिक्रिया व सूचना कळवाव्यात, जेणेकरून ही डिजिटल सेवा अधिक उपयुक्त बनवता येईल.
नव्याने प्रकाशित झालेल्या संकेतस्थळाचे मुख्यपृष्ठ.